🙏पेन आणि संस्कार 🙏
पुण्याला जात असताना एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो.....
एक १२/१३ वर्षाचा साधे कपडे घातलेला चुणचुणीत मुलगा माझ्या मागे रेंगाळत असल्याचं जाणवलं.....
चहापान झाल्यावर निघालो तेव्हा माझी नजर त्याला शोधत होती.....
गाडीपासून २०/२५ फुटांवर झाडाच्या आडोशाला "तो" उभा होता..... नजर माझ्याकडे.
मी त्याला जवळ बोलावलं.....
" भूक लागली का ?" विचारलं.....
तो मानेनंच नाही म्हणाला.....
माझी उत्सुकता वाढली.....
" पैसे पाहिजेत ??"
" नाही"
" मग ?"
पाठीमागे लपवलेला पुष्ट्याचा प्याड, निबंधाची वही अन् रिफील संपलेला रुपयाचा पेन (Use & throw) त्याने दाखवला.....
....." पेनची नळी संपली .....
घेऊन द्या ना ....!!"
मी ५/- रूपये दिले.
तो..... " पैसे नको नळी घेऊन द्या "
मी म्हटलं " का ? "
तो... " माझी माय म्हणली, कुणाकडून फुकटचे पैसे घ्यायचे नाही."
..... मी जितके फुकटचे पैसे घेईन तितकं माझ्या मायचं आयुष्य कमी हुईल....!!
त्याचं उत्तर ऐकून माझ्या डोक्यात प्रश्नांचं काहूर उठलं.....
माझी माणुसकीची नशा..... खाडकन उतरली.....
दातृत्वाचं ढोंग त्याच्या एका संस्कारापुढे कवडीमोल ठरलं.....
मी गाडीतून उतरलो..... त्यांचं नाव विचारलं..... बंड्या.
बंड्या मला टपरीकडे घेऊन गेला..... पेन घेतल्यावर बंड्या खुलला. माझ्या डोक्यातल्या प्रश्र्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो.
मी:- कितवीत आहेस ?
बंड्या:- मराठी ७ वीत....
मी:- काय लिहितोस ???
बंड्या:- निबंध..... माझी आई !!!!
मी:- कुठे राहतोस ?
बंड्याने शेताकडे बोट दाखवलं..... लांब वर एक झोपडी दिसत होती..... बंड्याचा बाप शेतावर जागल्या होता..... आई शेतावर मजुरी करत होती..... बंड्याला चार भावंडे होती. मी वही हातात घेऊन चाळली.....
बंड्या झेड पी च्या शाळेत होता. त्याचं पूर्ण नाव वाचलं. अन् मग विचारलं, " माझ्याकडेच नळी का मागितली.....?"
बंड्या गांगरला.....
मी परत विचारलं " इथं इतके लोक आहेत, मग माझ्याकडेच नळी का मागितली ?"
बंड्या:- " तुमच्याच खिशाला पेन दिसला म्हणून!!!!" मग मी सगळीकडे बघितलं..... बरेचसे लोक टी शर्ट वर होते. काहींना खिसे नव्हते..... तर काहींच्या खिशाला पेन नव्हते..... बंड्याचे निरिक्षण अचूक होते..... माझ्या खिशाला माझा आवडता पेन होता.
मी:- " तुला कोण व्हायचंय, मोठा झाल्यावर ?".....
बंड्या:- " फौजदार !!!"
मी:- " फौजदार ? कसा काय ?? कुणी सांगितलं .....??"
बंड्या:- " मास्तर म्हणले की मी खूप अभ्यास केला की फौजदार होईल.....!!"
मला त्याचं उत्तर आवडलं.....!!
माझ्या बरोबरचे मित्र वैतागले होते.....!
स्वत:च्या आयुष्याला फुकटचे पैसे न घेण्याच्या संस्काराशी जोडणा-या त्या माऊलीला
अन्
निरागस डोळ्यांमध्ये फौजदार होण्याचं स्वप्न देणा-या झेड पी च्या गुरूजींना मी मनोमन नमस्कार केला....!
माझ्या खिशाचा आवडता पेन काढला.....
बंड्याच्या खिशाला लावला.....!
त्याच्या खांद्यावर हात ठेवला..... अन् माझ्या आवडत्या देशाच्या भावी इन्स्पेक्टरशी शेकहॅंड करून गाडीत बसलो.....!! तो गाडीकडे बघत हात हलवत होता.....!!
मी निश्चिंत होतो.....
कितीही भ्रष्टाचार वाढो.....
जोपर्यंत अशा माऊल्यांचे संस्कार आहेत तोवर माझ्या देशाचं भविष्य उज्वल असल्याबद्दलची मला खात्री पटली.....!!
धन्य ती माता, धन्य तो पिता
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment