Tuesday, August 25, 2020

 *मुलांवर संस्कार कसे करावेत.??*


तिनं सहज विचारलं मला, 

"तेलात फोडणीला 

तू प्रथम मोहरी टाकते कि जिरे?"


"अहो मोहरी."


"का गं?"


"मोहरी तडतडते ना खूप."

मग तिला तडतडू द्यायचं,

नि मग हळुवार जिरे सोडायचे.

जिरे नुसतेच लाल होतात बघ!!"


"जीवनाचं सूत्रच आहे ग."ं


"कोणतं?"


"तडतडणाऱ्याला तडतडू द्यायचं.

त्याचं तडतडणं थांबलं की

हळूच प्रेमाचे जिरे सोडायचे.

जशी फोडणी खमंग, 

तसंच आयुष्य देखील खमंग.!!"👍👍 


"कसं?"

           

"संस्कार मुलांवर करताना ते त्यांच्यावर ओरडून, त्यांना मारून करता येत नाहीत. संस्कार करायचे म्हणून करता येत नसतात, तर ते आपल्या बोलण्यातून, वागण्यातून सहज आले पाहिजेत, तरच ते मुलांच्यात खोलवर रुजले जातात. याचं एक सुंदर उदाहरण पहा."


एक मध्यमवयीन गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक ७-८ वर्षांचा मुलगा भर दुपारी असेच फिरत होते. वाटेत त्यांना एक मोठं शेत लागलं. शेतात एक शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाखाली त्याचं जुजबी सामान होतं आणि झाडाच्या फांदीवर त्याने आपला सदरा अडकवला होता. 

सदरा पाहताच या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरू झालं आणि त्याचे डोळे चमकू लागले.

तो म्हणाला, "बाबा, त्या सदऱ्याच्या खिशामध्ये मी आता २-२ दगड ठेवतो, जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल आणि खिशात हात घालून दगड पाहील तेव्हा खूप मजा येईल."


बाबा म्हणाले, "हो, पण मी एक बदल सुचवतो बघ. त्या दगडांच्या ऐवजी आपण २-२ चांदीचे रुपये ठेवू या."


मुलगा म्हणाला, "छे, दगडानं जास्त गंमत येईल, रुपयांपेक्षा."


पण बाबा म्हणाले, "पहा तर, तुला जास्त मजा येईल."


मुलगा थोड्या नाराजीनेच तयार झाला आणि त्यानं टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदऱ्याच्या दोन्ही खिशात २-२ चांदीचे रुपये ठेवले. त्याला माहीत होतं, मजा तर येणारच नाही, उलट रुपये मात्र जाणार. 

ते दोघेही एका झाडामागे लपून शेतकऱ्याकडे पाहू लागले. सूर्य डोक्यावर आला. शेतकऱ्यानं नांगरणी थांबवून बैल सोडले आणि एका झाडाखाली त्यांना बांधलं, चारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटत बांधावर बसला. आता त्याचं बोलणं या दोघांनाही ऐकू येऊ लागलं.


"कालच्यान अन्नाचा कण कोनाच्या पोटात गेला नाई. घरात शिजवायला कायबी नाई. कारभारीनबी उपाशीच. लेकराला दूध नाई. कसं व्हणार? काय बी समजंना."


मग हताश होऊन तो उठला. मडक्यातील पाणी प्यायला आणि फांदीवरचा सदरा काढून अंगात घातला. सवयीने खिशात हात गेला. हाताला काही लागलं म्हणून पाहतो तो काय चांदीचे २ रुपये!!

दुसऱ्या खिशात हात घातला तर त्यामध्येही २ रुपये!! 


त्याच्या चेहऱ्यावर मघापासून जी उदासीनता होती ती नाहीशी झाली. त्याचा चेहरा उजळला आणि पुन्हा बोलू लागला.


"आता या पैशानं मी धान आणील आणि कारभारनीकडं देईन. मग ती रांधून पोटभर जेवेल आणि लेकरालाबी दूध पाजंल. लेकरू मग खूप खुश होईल. त्या दोघांना असं आनंदात बघून माझंबी पोट भरंल."


मग तो नांगरलेल्या शेतात गेला, वरती आकाशाकडे पाहत बोलू लागला,

"देवा, कोणाच्या रूपानं तू माज्यासाठी येवडा तरास घेतलास? ज्येनं ह्ये काम केलं त्येला खूप आयुक्ष दे. त्यो जगाचा धर्मावतार होऊ दे. देवा, ही सारी तुजी दया. म्या आज भरून पावलो."


हे सारं बोलणं ऐकून तो लहान मुलगा रडू लागला.

आपल्याला काय होतं आहे हे त्यालाच कळत नव्हतं. तो बाबांना म्हणाला,

"बाबा, मला काय होतंय हे मला काहीच कळत नाही. असं वाटतंय की, माझ्या शरीराला लक्ष लक्ष डोळे फुटले आहेत आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतो आहे! पण तरीही माझ्या अंगातून सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी उचंबळत आहेत."


बाबा म्हणाले,

"बाळ, माणुसकीचा एक धडा तू आज शिकलास. त्या गरिबाचे शब्द तू ऐकलेस ना?

त्याचा आशीर्वाद देवाघरून आला आहे, तो खरा होणार."


अशी शिकवण हवी, असा गुरु हवा किंवा असा संस्कार हवा की, तो कायमचा मनावर बिंबला जाईल. धाकदपटशा करून, जसे की, तू असेच वागायला हवे, तसेच वागायला हवे.असे करून संस्कार होत नसतात.

आपणच आपल्या आचरणातून, वागणुकीतून सहज ते प्रकट करायला हवेत आणि मुलांना जाणवून द्यायला हवेत.!!


   💐💐💐💐💐💐💐